त्रिपुरारी पौर्णिमेचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा; पालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले नियोजन !
अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोटला राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त यात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून महसूल आणि पालिका प्रशासनाने नियोजन चांगल्या पद्धतीने करावे, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी दिल्या. शनिवारी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर उपविभाग पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला तहसीलदार बाळासाहेब सिरसट, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी,प्रदीप काळे ,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, कार्यालयाचे धनराज शिंदे, गोपनीयचे शरद चव्हाण, गजानन शिंदे,मेजर अंबादास दुधभाते आदींची उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी याचे नियोजन करण्यात आले.
७ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त मंदिर परिसर,अन्नछत्र मंडळ, भक्तनिवास, मैंदर्गी नाका या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन भाविकांना त्रास होणार नाही.या दृष्टीने मंदिर परिसरात चार चाकी वाहने येणार नाहीत ते बाह्य वळणाने(बायपासने) बाहेरच जातील.
याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना आदेशीत केले असून छोट्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कमलाराजे चौक,हत्ती तलाव जवळ बासलेगाव रोड,श्री स्वामी समर्थ दवाखाना मैंदर्गी रोड, अन्नछत्र मंडळ या ठिकाणी करण्यात आली आहे.अन्नछत्र मंडळात असलेली पार्किंग व्यवस्था मैंदर्गी रोडच्या बाहेर पडणाऱ्या गेट मधुनच प्रवेश करेल आणि तेथुनच बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याला अमोलराजे भोसले यांनी सहमती दर्शविली. त्याचबरोबर अक्कलकोट शहरात छोटे -मोठे वाहन मंदिर परिसराकडे येणार नाहीत त्या अनुषंगाने नगरपालिका यांचेकडून अक्कलकोट शहरातील महत्वाच्या ठिकाणी मजबुत स्वरूपाचे बॅरेंगेटिंग करण्यात यावेत असे गौर यांनी सूचित केले.
मुख्याधिकारी पाटील यांनी कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, मैंदर्गी नाका, भक्त निवास हत्ती तलाव, समाधी मठ या ठिकाणी लाकडी बॅरेंगेटिंग करण्यात येणार असून सध्या लोखंडी स्वरूपाचे चाकाचे ३० बॅरेंगेटिंग तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ यांना, मंदिरातील दर्शन रांग, भाविकांना रांगेत पिण्याची पाण्याची व्यवस्था, उन्हात जास्त वेळ थांबावे लागले तर बाहेरील दर्शन रांगेत मंडपची व्यवस्था करण्यात यावी, असे सांगण्यात आले.
याला इंगळे व भोसले यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे स्पष्ट केले. त्रिपुरारी पौर्णिमा करीता सहा अधिकारी शंभर पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे गौर यांनी यावेळी नमूद केले.
भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
कोठेही अनुचित प्रकार घडु न देता अतिशय चांगल्या पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमाचे नियोजन पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि आम्ही करत आहोत. स्वतः जातीने हजर राहुन भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. याकडे पूर्ण लक्ष असेल- बाळासाहेब सिरसट,तहसीलदार