लातूर : वृत्तसंस्था
मी मॅनेज होत नाही, असे समजल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डाव टाकून माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी चौकशी लावून मला राज्यातून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु, मी अजिबात घाबरणार नाही. करून करून काय करणार, तुरुंगात टाकणार असतील, तरीही मी भीत नाही. मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्यांना सोडणार नाही. तुरुंगात राहूनही मराठ्यांचा दहा पट मोठा मोर्चा काढणार, असा इशारा देत मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक होत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
उदगीर येथील रघुकूल मंगल कार्यालयात बुधवारी (दि. १०) मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची संवाद बैठक झाली. यावेळी उदगीर शहर व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न असून, जो कोणी मराठा व मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल, त्याला सोडणार नाही. आगामी काळात मराठा आरक्षणासाठी झुंज द्यावी लागणार आहे. माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्र रचले जात आहेत. विविध पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझा समाज माझ्या संरक्षणासाठी सक्षम असून, पोलीस संरक्षणाची मला गरज नाही. माझ्या जवळच्या लोकांना फोडून माझ्या विरोधात बोलण्यासाठी टीव्हीवर पाठवतात.
परंतु, त्यांच्याकडे असलेले अनेक लोक त्यांचे ठरलेले डाव मला सांगतात. माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्र रचून विविध पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला. गोदापट्ट्यातील लोकांना पैसे वाटून फोडण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांना विकत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मराठा विकू शकत नाही, मराठा समाज अवघ्या दोन तासांत पाच करोड रुपये जमा करून देऊ शकतो, असे ते म्हणाले.