नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २२वा हप्ता आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरित करण्यात येणार असून यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे. या हप्त्याचा लाभ देशातील सुमारे ९.३ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही. काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे हप्ता तात्पुरता थांबू शकतो. ई-केवायसी पूर्ण नसणे, आधार कार्ड खात्याशी लिंक नसणे, एग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी न करणे किंवा नावातील स्पेलिंगमध्ये त्रुटी असल्यास हप्ता थांबू शकतो.
सरकारने ई-केवायसी पूर्ण करणे आणि एग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत नाही.
लाभार्थी यादी कशी तपासाल?
शेतकरी घरबसल्या आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे सहज तपासू शकतात. त्यासाठी खालील प्रक्रिया करावी:
-
pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
-
“Farmer Corner” हा पर्याय निवडा
-
त्यानंतर “Beneficiary List” वर क्लिक करा
-
आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका
-
“Get Data” वर क्लिक करून पेमेंट स्टेटस तपासा
पीएम किसान योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी 1800-115-5525 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात मदत केली जाते. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार मिळत आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.