धुळे वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळ्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांमध्ये कुरघोड्या सुरु असल्याचा आरोप मोदींनी केला.
यावेळी मोदी म्हणाले की, भारतातलं सगळ्यात मोठं वाढवण बंदर आपल्याच महाराष्ट्रात उभं राहात आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोठ्या प्रोजेक्टमुळे महाराष्ट्रात नवे रोजगार तयार होत आहेत. ज्या दिवशी मी वाढवण पोर्टच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे एक इच्छा व्यक्त केली होती. देशातलं सगळ्यात मोठं बंदर उभं राहात असेल आणि मोदीजी इतकं सगळं करत आहात, हजारो कोटी खर्च करत आहात तर तिथे एक एअरपोर्ट उभं करा, अशी इच्छा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती. त्या दिवशी तर मी शांत राहिलो होतो. परंतु राज्यातली आचारसंहिता जेव्हा संपेल आणि महाराष्ट्रात महायुतीचा शपथविधी होईल, तेव्हा मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून देवेंद्रजींची इच्छा कशी पूर्ण होईल, यासाठी काम करेन.
”धुळ्याचं हे क्षेत्र औद्योगिक विकासात पुढे जात आहे. देवेंद्रजींनी धुळ्याचं किती सुंदर वर्णन केलं. देशात असा जिल्हा नसेल ज्याला इतकी संसाधनं मिळाली आहेत. टेक्स्टाईलचंही हे मोठं केंद्र आहे आणि मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडोअरशी जोडलेलं आहे. धुळ्याची कनेक्टिव्हिटी इथल्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत.” असंही मोदी म्हणाले. फडणवीसांनी वाढवण बंदरावर एअरपोर्ट उभं करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, त्याला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
वाढवण बंदरामुळे १२ लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. बंदरात स्थानिकांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. कौशल्य विकास करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना मासेमारीसाठी मदत होणार आहे. भारतात मोठे बंदर नसल्याने समुद्रमार्गे होणारी व्यापारी आणि मालवाहतूक दुसऱ्या देशात जात आहे. त्यामुळे नुकसान होत असून वाढवण बंदरामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारात वाढ होईल.