छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. एक जण विटा घेऊन आयुक्तालयात आला होता. त्यानेच हा प्रकार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यक्तीने आपला संताप व्यक्त करत ही तोडफोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एका बॅगेत दोन विटा घेऊन आला होता. आधी त्याने आयुक्तालयाची मुख्य दरवाजाची काच फोडली. यानंतर त्याने आयुक्तांची गाडी फोडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोरच घडला आहे. चक्क पोलीस आयुक्तालय फोडण्यात आल्याने नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
माझे गुन्हे नोंदवून घेत नाही, असा या व्यक्तीचा राग होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस आयुक्तांचीच गाडी आयुक्तालयात फुटत असेल तर सामान्य माणसांनी कोणाकडे आपल्या समस्या मांडायचा, पोलीस सुरक्षित नसतील तर तिथे सामान्यांचं काय? असाही प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.