सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी विशेष पथकांकडून ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये ४३० लिटर हातभट्टी दारू, २६ हजार ४५० लिटर गुळ मिश्रित रसायन असे जवळपास १३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरित्या दारुची विक्री होण्याची शक्यता असते. यावर आवर घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस अंमलदार यांची विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत.
नियंत्रण कक्षचे पो.नि.बालाजी कुकडे यांची उत्तर व दक्षिण सोलापूर, जिल्हा वाहतूक शाखेचे पो. नि. कमलाकर पाटील यांची करमाळा, आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. संजय जगताप यांची अक्कलकोट, अनैतिक मानवी वाहतूक कक्षचे पो.नि. बजरंग साळुंखे यांची पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी पथके नेमण्यात आली. मुळेगाव तांडा, भानुदास तांडा, गुळवंची तांडा, बक्षी हिप्परगा, तिल्हाळ, तडवळ, भोसगा तांडा, नागूर तांडा, मुंढेवाडी, सव्हत गव्हाण, गुरसाळे, श्रीपूर, धर्मपुरी, चव्हाणवाडी, शेळगाव, जेऊर, सुगाव, भाळवणी आदी ठिकाणी सुरु असलेल्या दारुच्या भट्टयांवर कारवाई करण्यात आली.