मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून नवा वाद उफाळून आला आहे. भाजपाचे गुजरातमधील नेते व केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या टीकेला भाजपानेही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
गुजरातमध्ये झालेल्या एका सभेत गुजराती भाषेत बोलताना सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “मला खूप आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देखील पाटीदार होते. त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना यशस्वीपणे केली,” असे विधान पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
या विधानाचा आधार घेत संजय राऊत यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. “छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती, तिथे दाणादाण उडवली होती, हे विसरू नका,” असा टोला त्यांनी लगावला. शिवाजी महाराजांना जात लावू नये, असे आवाहन करत राऊतांनी भाजपावर निर्लज्जपणाचा आरोप केला. “तुमच्या गुजरातमध्ये काय महापुरुष नाहीत का? की सगळे राक्षसच आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राऊतांच्या या वक्तव्याला भाजपाचे नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजलखान जास्त प्रिय आहे. अफजलखानाची पिलावळ आणि त्याचा उदोउदो करणे हेच राऊतांचे काम आहे,” असा आरोप बन यांनी केला.
निवडणुकीच्या तोंडावर शिवरायांच्या नावावरून सुरू झालेला हा वाद आता थेट आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला असून, ठाकरे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.