नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या एंट्रीने वातावरण तापले होते. दाऊदच्या नातेवाईकांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना सोबत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही मलिक यांच्याशी संबंध नाकारले आहेत. नवाब मालिक यांनी ते कुठे जाणार आहेत ते स्पष्ट केलेले नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की, मी माझी भूमिका सांगेन, अशी सावध प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
नवाब मलिक हे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सोबत बसल्याने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून मलिक यांना सोबत घेण्यास विरोध व्यक्त केला. त्यांच्या या पत्राने राष्ट्रवादीत नाराजी असली तरी फडणवीस यांच्याशी संघर्ष टाळण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. शुक्रवारी या पत्रावर बोलताना अजित पवार म्हणाले, नवाब मलिक कालच सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनीच दाखवले आहे. स्वतः नवाब मलिकांची भूमिका अजूनही पुढे आलेली नाही. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले होते. विधानसभा अध्यक्षांना सभागृहाता कोणाला कुठे बसवायचे याचा अधिकार आहे, मलिक यांची भूमिका काय आहे ते पाहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या घडामोडीशी नवाब मलिक यांचा कोणताही संबंध नाही किंवा तशी त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असून त्यांची भूमिका ऐकल्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया देऊ. मलिक यांच्यासंदर्भात मला देवेंद्र फडणवीसांचे पत्र मिळाले असून मी ते वाचले आहे. त्याचे काय करायचे ते मी बघतो, असेही अजित पवार म्हणाले.