मुंबई वृत्तसंस्था : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत फडणवीस म्हणाले की, सध्याचं त्यांचं राजकारण हे विचारधारेपेक्षा मतांसाठी लांगुलचालनावर आधारित आहे. काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधून संबंधित नेत्यांची दिशा, विचार आणि चारित्र्य जनतेसमोर स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यांच्या वारसांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशिद खान मामू यांना पक्षात प्रवेश देण्याचा संदर्भ देत, हा निर्णय केवळ मतांचे राजकारण साधण्यासाठी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारे व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यातून नेतृत्वाची वैचारिक घसरण दिसून येते, असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी आणखी आक्रमक शब्दांत सांगितले की, “विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळवण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही.” सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात असल्याचा आरोप करत, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक नागरिक हे सर्व लक्षपूर्वक पाहत असून, अशा राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महायुतीची घोषणा करण्याची कोणतीही घाई नाही. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत, आमच्यात कोणताही संभ्रम नाही. आमची एकजूट घोषणांतून नाही तर कृतीतून दिसते, असा दावा त्यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या घोषणा या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ देत फडणवीस यांनी उपरोधिक टिप्पणी केली. “पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच घोषणा करावी लागते,” असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्या युतीत काय सुरू आहे, हे कुणालाच कळत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.