ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ‘या’ दिवशी होणार मतदान

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सोलापूर शहर काँग्रेस भवनने आपला नाम फलक कापडाने झाकून घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १९ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होईल. सहाव्या टप्प्यासाठी २५ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होईल. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. सतराव्या लोकसभेचा कालावधी १६ जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. देशातील ९६ कोटी मतदार यंदा मतदान करतील. त्यात शंभर वर्षांवरील मतदारांची संख्या २ लाख आहे. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदार संघांच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचेही कुमार यांनी जाहीर केले. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार म्हणून जिल्हा परिषद महसूल व महापालिकामधील काही कार्यालये शनिवारी सुरू होती. मार्चअखेर व नवीन कामांचा मुहूर्त या ज्यादा कामात साधण्यात आला. आचारसंहिता लागू झाली की महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्य सरकारी गाड्या काढण्यात येतात. पण सध्या या ठिकाणी प्रशासकराज सुरू असल्याने ही धावपळ दिसून आली नाही. काँग्रेसने मात्र तातडीने आपल्या कार्यालयाचा फलक कापडाने झाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!