मुंबई प्रतिनिधी : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने इतिहासप्रेमी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीतील धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमान यांचे प्रभावी दर्शन या टीझरमधून घडते.
मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांचा प्रवास अधिक भव्य करणारे दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. हा चित्रपट श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असून, याआधीच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’बाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत मुत्सद्देगिरी, शूर पराक्रम आणि गनिमी काव्याची प्रभावी अंमलबजावणी हा त्यांच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. औरंगजेबाचे बलाढ्य मुघल साम्राज्य हादरवून सोडणाऱ्या महाराजांनी, शत्रूच्या दरबारात जाऊनही स्वराज्याचा स्वाभिमान ठामपणे मांडला. आग्र्याला जाण्याचा निर्णय आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला दिलेले आव्हान हा शिवचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक अध्याय मानला जातो.
रक्ताचा एकही थेंब न सांडता, केवळ बुद्धिचातुर्य आणि रणनितीच्या जोरावर शत्रूवर मात करण्याची महाराजांची विलक्षण क्षमता या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. शिवचरित्रातील हा रोमांचक अध्याय भव्य ऐतिहासिक मांडणीसह शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.