---Advertisement---

…तर शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर पडेल ; तुपकर आक्रमक !

By team
On: August 13, 2025 5:05 PM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर बसेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी हिंगोली येथे दिला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, घरकुल आणि विहिरी-गोठ्यांचे अनुदान तातडीने मिळावे, तेल आयात थांबवावी, डीओसी पावडरची निर्यात सुरू करावी आणि मेंढपाळांना चराईसाठी मुभा द्यावी, या मागण्यांसाठी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, धनगर समाजाचे नेते वैजनाथ पावडे, गजानन जाधव, प्रवीण मते, संजय मुळे, सखाराम भाकरे, विनोद जाधव, आदित्य टेकाळे, मुनीर पठाण आदी उपस्थित होते.

मोर्चानंतर बोलताना तुपकर म्हणाले, “निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. लाखो शेतकरी सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.” त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधताना तेल आयात थांबवून डीओसी पावडरची निर्यात सुरू करण्याची मागणी केली. तसेच मेंढपाळांना चराईसाठी मुभा द्यावी, असेही ते म्हणाले. “हिंगोलीचा हा मोर्चा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. सरकारने कर्जमाफी न केल्यास शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर चोप देतील,” असा इशारा त्यांनी दिला. यापुढील आंदोलन तीव्र करण्यासाठी लवकरच नियोजन बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोर्चादरम्यान बाबुळगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची राख आंदोलकांनी प्रशासनाकडे सुपूर्द केली. ही राख शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

तुपकर यांनी सरकारला शेतकऱ्यांना गृहीत धरू नये, असा सज्जड दम देत पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असे संकेत दिले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावले. मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, येत्या काळात सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!