मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना देखील धक्का बसणार असल्याचा दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडू यांचा एक सहकारी नेता सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेसोबत जाऊ शकतो, असे ते म्हणालेत. उल्लेखनीय बाब म्हणजे बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा ठोकताच त्यांनी हा इशारा दिला आहे हे विशेष.
बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला. तसेच विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यापुढे आपल्या प्रहार संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर काही वेळातच नवनीत यांचे पती आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट् केली. प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांची साथ सोडण्याच्या विचारात आहेत. त्यांची स्वतःची या मतदार संघावर पकड आहे. ते स्वतःच्या जोरावर आमदार झालेत. त्यांच्या पक्षाचा त्यात कोणताही वाटा नाही, असे रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला हाणताना म्हटले आहे.
राजकुमार पटेल आता वेगळ्या वाटेवर असल्याचे बच्चू कडू यांना व मलाही माहिती आहे. त्यांना भाजपची उमेदवारी हवी आहे. त्यांचा भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडेही कल आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणताही बदल होऊ शकतो, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. सर्वांनी आपापल्या लोकांना सांभाळून ठेवले पाहिजे. स्वतःची जागा राखून ठेवली पाहिजे. आपलीच जागा धोक्यात असेल तर आपण दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही. बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत आम्हाला पूर्ण ताकदीने सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्हीही त्यांना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत साथ देऊ, असेही रवी राणा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.