अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु
२० हजार कार्यकर्ते राहणार उपस्थित
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अक्कलकोट दौऱ्यावर येत असून दौऱ्याची जय्यत तयारी सध्या भाजपच्यावतीने करण्यात येत आहे.या दौऱ्याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लागली आहे. यावेळी ही सभा फत्तेसिंह मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली.
बुधवारी,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या समवेत तहसीलदार बाळासाहेब सिरसट,मुख्याधिकारी सचिन पाटील ,पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, महावितरणचे संजीव कुमार म्हेत्रे, शहर विभागाचे माळवदकर, अक्कलकोट बस स्थानकाचे आगार प्रमुख मदनीपाशा जुनेदी यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सभेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.त्यांच्या समवेत माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू, रशीद खिस्तके,शरणू कापसे,केदार माळशेट्टी, लालसिंग राठोड ,मल्लिकार्जुन आळगी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पहिल्यांदाच प्रत्यक्ष मैदानावर होत आहे.
दरवेळी ही सभा मल्लिकार्जुन मंदिराजवळ होत होती.यावेळी मात्र मैदान भव्य असल्याने या ठिकाणी २० ते २२ हजार कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे.या मेळाव्याच्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २९ कोटी रुपये खर्चाच्या अक्कलकोट बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.त्याशिवाय अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर पायाभरणी समारंभ देखील त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याशिवाय अक्कलकोट नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे,अशी माहिती माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.यासाठी अक्कलकोट शहराला जोडणाऱ्या विविध मार्गावर स्वागत कमान उभा करण्यात येत असून अनेक ठिकाणी कटाआउट आणि बॅनर देखील लावण्यात येत आहेत.या दौऱ्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी केले आहे.