मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली असून मुंबईतील शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ‘न्याय संकल्प’ पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या आदेशाचा ‘आवाज’ घोंगावतो. या मैदानावर सभा म्हणजे ठाकरेंचेच नेतृत्व, ठाकरेच मुख्य नेते, ठाकरेंचेच मुख्य भाषण, अशी शिवसेनेची अस्मिता होती. पण शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रा समारोपानिमित्त आयोजित सभेत सहभागी होतील. एवढेच नव्हे तर या सभेत उद्धव ठाकरे यांचे नव्हे तर राहुल गांधींचे मुख्य भाषण होईल.
दरम्यान, राहुल गांधींच्या आजच्या सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे बोलले जात आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा आहे.