नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज देशाचा प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. देश ‘विकसित भारत’ आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने ओतप्रोत आहे. ही भावना व गती आपल्याला २०२४ सालात देखील कायम ठेवायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ‘मन की बात’ मध्ये म्हणाले. मोदींनी देशवासीयांना आरोग्याचा मंत्र देताना सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्यावर भर दिला. पंतप्रधानांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
आकाशवाणीवरील मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०८ वा भाग रविवारी प्रसारित झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी १०८ अंकाचे महत्त्व सांगत आजचा भाग आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी शारीरिक, मानसिक आरोग्य, संतुलित आहार याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत विकसित झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा युवकांना होईल. युवा पिढी निरोगी, सुदृढ असेल तर हा फायदा अधिक असेल, असे मोदी म्हणाले. या वेळी अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर, विश्वविजेते बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अभिनेता अक्षयकुमार यांनीदेखील आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले. जो देश नवनिर्मितीला महत्त्व देत नाही त्याचा विकास थांबतो. भारत नवनिर्मितीचे केंद्र बनला असून, आता आपण थांबणार नाही. आज देशाचा प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. देश ‘विकसित भारत’ आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने ओतप्रोत आहे. ही भावना व गती आपल्याला २०२४ सालातदेखील कायम ठेवायची आहे, असे मोदी म्हणाले.