नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशिया दौऱ्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री ऑस्ट्रिया येथे पोहोचले. ४१ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड कार्पेटवर भव्य स्वागत करण्यात आले. पीएम मोदी म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील मैत्रीचे संबंध आगामी काळात आणखी मजबूत होतील. दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पीएम मोदी विमानतळावर पोहोचताच ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी त्यांचे स्वागत केले.
पीएम मोदी यांनी अधिकृत चर्चेपूर्वी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांची खासगी डिनरच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांनी पीएम मोदींसोबत सेल्फी काढला. या क्षणाचा फोटो नेहमर यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत, भारत हा आमचा मित्र आणि भागीदार असल्याचे म्हटले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे व्हिएन्नामध्ये स्वागत आहे! ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करणे हा आमच्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे मित्र आणि भागीदार आहेत. तुमच्या भेटीदरम्यान राजकीय आणि आर्थिक चर्चेसाठी मी उत्सुक आहे!” असे ऑस्ट्रियाच्या चान्सलरनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत ऑस्ट्रियातील भव्य स्वागताबद्दल चान्सलर कार्ल नेहमर यांचे आभार मानले आहेत. ‘मला उद्याच्या चर्चेची प्रतीक्षा आहे. जागतिक हितासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.’ असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. पीए मोदी या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतील आणि बुधवारी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पीएम मोदी आणि नेहमर भारत आणि ऑस्ट्रियातील उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनाही संबोधित करतील.