मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून मोदी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून ते थेट सीएसएमटीच्या दिशेनं रवाना होतील.
या दौऱ्यात सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास या दोन रस्ते प्रकल्पांचंही लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मुंबईतील दाऊदी बोहरा समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत. अलर्टमध्ये मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे.