ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट; अक्कलकोटचा देशपातळीवर उल्लेख

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्डमुळे मिळणार रोजगाराला चालना

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मराठीतून ट्वीट करत अक्कलकोटचा उल्लेख केल्याने शहर व तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पावर पंतप्रधानांनी स्वतः भाष्य केल्याने अक्कलकोटचा विकास देशपातळीवर अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला ‘परिवर्तनकारी प्रकल्प’ संबोधले आहे. पीएम गतिशक्ती योजनेशी सुसंगत असलेला हा महामार्ग प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करणार असून पश्चिम–पूर्व दळणवळण अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना देईल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक ते सोलापूर आणि पुढे अक्कलकोटपर्यंत विकसित होणारा हा सहा पदरी महामार्ग पूर्णपणे नवीन मार्गावरून उभारला जात असून त्यामुळे हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर ठरणार आहे. उत्तर व दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग व्यापार, उद्योग आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पंतप्रधानांच्या या ट्वीटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वागत केले असून, अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागाचा थेट उल्लेख पंतप्रधानांकडून होणे ही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या महामार्गामुळे परिसराचा औद्योगिक व आर्थिक विकास वेग घेईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनीही प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने अक्कलकोटचा उल्लेख करत मराठीतून ट्वीट करणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे अक्कलकोटचा विकासाचा मुद्दा देशपातळीवर पोहोचला असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!