बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी या प्रकरणी आज गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यात मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी होणार आहेत. या सर्वांनी तपास यंत्रणांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येला महिन्याभराहून अधिकचा काळ लोटला आहे. सरकारने या घटनेची एसआयटी व सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी 7 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अद्याप 1 आरोपी फरार आहे. विशेषतः या संपूर्ण प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणांच्या निषेधार्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या एका बैठकीत या आंदोलनाचा निर्णय दिला. या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली नाही तर 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतींच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे. वाल्मीक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणात वाचवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. कायद्यास अपेक्षित असलेला न्याय देशमुख कुटुंबियांना मिळत नसेल तर मला या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबीय व मस्साजोग परिसरातील नागरिकांसोबत येणाऱ्या काळात अनोखे आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची असेल, असे त्यांनी म्हटले आहे.