नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडनेट आणि पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु कोणत्याही विमा संरक्षणाची तरतूद नसल्याने शेडनेटधारक शेतकऱ्यांना कसलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी सभागृहात केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेडनेटसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, शासनाची पोकरा योजना तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून शेडनेट उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते.
शेडनेट शेतीच्या माध्यमातून कमी जागेत उत्तम शेती करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेडनेट उभारणीसाठी बँका, तसेच खासगी पतसंस्थांच्या माध्यमातून कर्जे काढून शेडनेट उभारली आहेत. मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात हे शेडनेट उडून उडून गेल्यावर त्याच्या नुकसानभरपाईसाठी कोणताही विमा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याचा विचार करून शासनाने शेडनेटच्या नुकसानभरपाईसाठी येत्या काळात मदत देण्याची अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.