बीड वृत्तसंस्था : जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कायम दुष्काळाच्या झळा सोसणारा भाग. मात्र याच दुष्काळी परिस्थितीत एका महिला शेतकऱ्याने जिद्द, मेहनत आणि नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर फायदेशीर शेती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कानडी खुर्द मेहकरी येथील महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी डांगर भोपळा पिकवून अवघ्या आठ महिन्यांत तब्बल 45 टन उत्पादन घेत ‘घामाचे मोती’ खऱ्या अर्थाने पिकवले आहेत.
मंदाकिनी गव्हाणे यांनी डांगर भोपळा पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत रासायनिक खतांचा पूर्णपणे त्याग केला. शेतातील पाला-पाचोळा आणि कचऱ्यापासून सेंद्रिय औषध तयार करून फवारणी करण्यात आली. 8 बाय 2 अंतरावर लागवड करून त्यांनी एकरी सुमारे 15 टन उत्पादन घेतले. विशेष म्हणजे या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या डांगर भोपळ्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पाच राज्यांत मोठी मागणी निर्माण झाली आहे.
या यशामुळे परिसरातील इतर महिलांनाही रोजगार मिळाला. मंदाकिनी गव्हाणे यांनी अनेक महिलांना मोफत मार्गदर्शन करून डांगर भोपळा पिकाकडे वळवले. “या पिकामुळे आमची आर्थिक प्रगती झाली, अशी माहिती महिला शेतकरी जैबुन पठाण यांनी दिली.
पूर्वी याच शेतात हरभऱ्याचे पीक घेतले जात होते. मात्र कमी उत्पादन आणि जास्त खर्चामुळे फारसा फायदा होत नव्हता. हरभऱ्याची चार पोती झाली, पण काढणी आणि मजुरीत सगळा खर्च निघून जायचा. त्यामुळे आम्ही पारंपरिक डांगर भोपळा पिकात बदल करून सेंद्रिय पद्धत अवलंबली आणि उत्पादनात मोठी वाढ झाली, असे मंदाकिनी गव्हाणे यांनी सांगितले.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या डांगर भोपळ्याला गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल तसेच उत्तर भारतात मोठी मागणी आहे. रासायनिक औषधांचा वापर टाळल्यामुळे भोपळा आरोग्यदायी असल्याचा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. या भोपळ्याच्या उत्पन्नावरच मंदाकिनी गव्हाणे यांनी आपल्या मुलाचे शिक्षण पुण्यात पूर्ण करून त्याला नोकरीलाही लावले आहे.
“शाळेत भोपळ्याचे कमी मार्क मिळाले असतील, पण त्याच भोपळ्याला मनाशी घट्ट धरून आज माझ्या शेतातील भोपळा परराज्यात पोहोचला आहे, असे भावनिक शब्दांत त्या सांगतात. त्यांच्या या जिद्दीने आणि यशाने आता परिसरातील अनेक शेतकरी डांगर भोपळा पिकाकडे वळत असून, दुष्काळी आष्टीत आशेचा नवा अंकुर फुटला आहे.