नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय नौदल फ्रान्सकडून २६ राफेल जेट लढाऊ विमानांची खरेदी करण्यापासून एक पाऊल दूर आहे. फ्रान्सने अधिकृतरीत्या या खरेदी कराराबाबतच्या बोलीचा सविस्तर तपशील पाठवून दिला आहे. या जेट विमानांचे विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनस विक्रमादित्यहून संचालन केले जाणार आहे. चीनच्या वाढत्या सागरी सामर्थ्याला टक्कर देण्यासाठी राफेल जेट लढाऊ विमानांची खरेदी महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी भारताने वायुदलासाठी फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती.
भारतीय नौदलाने २६ राफेल लढाऊ विमानासंदर्भात फ्रान्सकडे विचारणा केली होती. फ्रान्सने अधिकृतरीत्या यासंबंधीच्या बोलीबाबतचा सविस्तर तपशील पाठवला आहे. या तपशिलाचे बारकाईने मूल्यांकन केल्यानंतर नजीकच्या काळात भारत खरेदीच्या कत्रांटाबाबत फ्रान्ससोबत बोलणी सुरू करू शकतो. हा सौदा ५.५ अब्ज युरो अर्थात जवळपास ५०,१४१ कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाची आपल्या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांवर मिग-२९ जेट विमानांसाठी पुरक म्हणून राफेल जेट विमानाच्या खरेदीची योजना आहे.