नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरलेल्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईदरम्यान ‘भारत न्याय यात्रा’ सुरू करणार आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा २० मार्च रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये समारोप होईल. या कालावधीत राहुल गांधी बस आणि पायी अशा दोन्ही पद्धतीने १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांमधून ६२०० किमीचे अंतर पूर्ण करतील. यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेत पायी प्रवासावर अधिक भर देण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत न्याय यात्रा काँग्रेससाठी फायदेशीर तरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मणिपूरमध्ये ‘भारत न्याय यात्रे’ला हिरवा कंदील दाखवतील. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा यात्रेचा उद्देश असल्याचे काँग्रेसने म्हटले. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी बुधवारी पक्षाच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेत भारत न्याय यात्रेची माहिती दिली आहे.