मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खाते उघडता आले नाही. प्रचारसभांमध्ये तासंतास बोलणाऱ्या राज ठाकरेंनी पराभवावर मात्र तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत राज ठाकरे यांनी म्हटलं की, “अविश्वसनीय! तूर्तास एवढेच…”
माहीम मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो.”
“मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची – जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.”
“आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो – तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.