पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील राज्यातील जागा वाटपात एक किंवा दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. जागा वाटपाच्या चर्चा मी करू शकत नाही, त्यापेक्षा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केला होते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश देखील दिला होता. यामुळे आता महायुतीची ताकद वाढली असून राज ठाकरे यांचे फोटो लावून महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे. या मतदारसंघात प्रचाराचा धडका दोन्ही उमेदवाराकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे सुनेत्रा पवार यांना त्याचा फायदा होईल. यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकांवर आता राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे.