ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्ती मृत

आसाम प्रतिनिधी : राज्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला असून जमुनामुखच्या सानरोजा परिसरात सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने हत्तींच्या कळपाला जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे रुळ ओलांडत असताना वेगात येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्याने या दुर्घटनेत तब्बल आठ हत्तींचा जागीच मृत्यू झाला असून काही हत्ती जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धडकेचा फटका इतका जबरदस्त होता की ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हत्तींच्या शरीराचे तुकडे रुळांवर विखुरलेले दिसून आले. या घटनेमुळे संबंधित मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोको पायलटच्या नजरेस हत्तींचा कळप येताच त्याने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रेनचा वेग अधिक असल्याने अपघात टाळता आला नाही. धडकेनंतर ट्रेनला जोरदार धक्का बसल्याने डब्यांतील प्रवासी घाबरले. काही प्रवासी आपल्या आसनावरून खाली पडले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणताही प्रवासी गंभीर जखमी झालेला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

अपघातग्रस्त डब्यांतील प्रवाशांना इतर डब्यांमधील रिकाम्या बर्थवर हलवण्यात आले आहे. खराब झालेले डबे वेगळे केल्यानंतर ट्रेनला गुवाहाटीकडे रवाना करण्यात आले. गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असून त्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून प्रवासी व त्यांच्या नातेवाइकांसाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे वन्यजीव संरक्षण आणि रेल्वे मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!