मुंबई : वृत्तसंस्था
सध्या राज्यभर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी अचानक भेट घेतली. ही भेट सुमारे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झाली. उद्धव ठाकरे हे कोणतीही मोठी टीम किंवा नेत्यांना न घेता, एकटेच या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती, राजकीय वातावरणातील बदल आणि एकत्रितपणे लढण्याच्या शक्यतांवर चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे. सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र, या आघाडीत मनसेलादेखील सामील करण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत सकारात्मक भाव दाखवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विस्तार करण्यासाठी आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी मनसेची मदत घेण्याचे धोरण आखले जात असल्याचे चित्र आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्याला उत्तर म्हणून ही नवी युती महत्त्वाची ठरू शकते.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वातावरणाला नवा वेग आला आहे. एकेकाळी शिवसेनेच्या एका मंचावरून राज्यातल्या मराठी आणि हिंदुत्व राजकारणासाठी एकत्र आवाज उठवणारे ठाकरे बंधू, मागील दशकभरापासून वेगवेगळ्या राजकीय मार्गांनी पुढे गेले. आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते निर्णय झाले याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, राजकीय गणितात काहीही अशक्य नाही, हे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील राजकारणात नक्कीच नवे समीकरण तयार होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.