मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अनेक राजकीय मंडळी पक्ष बदल करताय. अजित पवारांनी भाजपच्या बड्या नेत्याला गळाला लावलय. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे अजित पवारांना विदर्भात मोठी ताकद मिळणार आहे.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला विदर्भात बळ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले हे 2009 ते 2014 पर्यंत भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा मोरगाव अर्जुनी विधानसभेतून आमदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं इंग्लंड येथील घर घेण्यात बडोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुढे यांच्याकडून राजकुमार बडोले यांना केवळ 718 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपसोबत आल्याने मोरगाव अर्जुनी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे प्रश्नचिन्ह असतानाच राजकुमार बडोले यांनी आज मुंबई येथे अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने आता इथली उमेदवारी कोणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेश कार्यालयात पार पडला. राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे अजित पवार म्हणाले.