ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रामभक्तांनो सावधान : राम मंदिराच्या नावाने सायबर गुन्हेगारी

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येत गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेग धरत असताना सायबर गुन्हेगारी वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतेच पोलिसांनी अटक केलेल्या एका भामट्याने मोफत प्रसाद वाटप, व्हीआयपी पास व प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६ लाखांहून अधिक लोकांना गंडविल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील भक्तिमय वातावरणाचा गैरफायदा घेण्याची संधी सध्या सायबर गुन्हेगार साधत आहेत. मोफत प्रसाद वाटप, व्हीआयपी पास तसेच मंदिराचा प्रवेश मिळवन देण्यासाठी सायबर गुन्हेगार लोकांना बनावट संदेश पाठवत असल्याची माहिती रविवारी अयोध्येतील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. सायबर फसवणूक केल्याप्रकरणी नुकतेच एका भारतवंशीय अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. या आरोपीवर १६ लाख लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या आरोपीने नागरिकांची फसवणूक करून जवळपास १०.५ कोटी रुपये एकत्र केले आहेत. वेबसाईटद्वारे केवळ डिलीव्हरीचे पैसे पाठवा व राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रसाद मोफत घरपोच मिळवा. या प्रकारचे आमिष दाखवून सायबर भामटे लोकांची फसवणूक करत आहेत. देशातील नागरिकांना ५१ रुपये, तर विदेशातील लोकांना ११ डॉलरच्या डिलीव्हरीचा खर्चही या भामट्यांकडून वसूल केला जात असल्याची माहिती अयोध्येचे क्षेत्रीय पोलीस अधिकारी शैलेंद सिंह यांनी दिली. भगवान श्रीरामाचा फोटो असणारे टी-शर्ट, रामनामाच्या चरण पादुका, रामाच्या नावाचे झेंडे व इतर वस्तू देण्याच्या नावाखाली हे लोक नागरिकांची फसवणूक करत आहेत. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी अयोध्या पोलिसांनी वृत्तपत्र व सोशल माध्यमांद्वारे लोकांमध्ये जनजागृती सुरू केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने देखील याप्रकरणी लोकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!