पुणे वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे मतदान उद्या पार पडणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्तेत एकत्र असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र वेगवेगळ्या आघाड्यांतून आमनेसामने उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका निवडणूक आधीपासूनच वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक युद्ध, तसेच काही उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप यामुळे वातावरण तापलेले असतानाच, धंगेकरांच्या पोस्टने या संघर्षाला नवे वळण दिले आहे.
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट भाजपवर गंभीर आरोप करत उमेदवारी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “भाजपने जणू चारित्र्यहीन लोकांसाठी स्वतंत्र आरक्षणच ठेवले आहे,” असा घणाघात करत प्रचार यंत्रणेतीलच काही प्रमुख व्यक्ती महापालिकेच्या टेंडरमधून मिळालेला पैसा डान्सबारमध्ये उडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा लोकांना तिकीट देणाऱ्या पक्षाकडून जनतेने नेमकी काय अपेक्षा ठेवावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
धंगेकरांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक १२ चा थेट उल्लेख करत भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा केला. संबंधित व्यक्तीवर एका आमदारांचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याचा आरोप असून, त्या पैशातून बारबाळांसाठी ‘स्वतंत्र कोटा’ ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा निवडणुकीच्या तोंडावर धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणावर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करावा, अशी थेट मागणी करत धंगेकरांनी भाजपला आव्हान दिले आहे. “भाजपमध्ये नेमक्या किती जागा अशा लोकांसाठी राखीव आहेत, हे जनतेसमोर स्पष्ट करा,” असा खोचक टोला लगावत त्यांनी पोस्टचा शेवट केला.
दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये ती चर्चेचा विषय ठरली आहे. समर्थकांकडून पोस्टचे स्वागत होत असताना भाजप समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अशा गंभीर आरोपांमुळे निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.