ध्यास विश्वसार्ह बातमीचा

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक घेणार

मुंबई , दि. 1 : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात  05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या वर्षी लॉकडाऊन कालावधी वाढल्याने असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार आपापल्या गावी परत निघाले. त्यावेळी त्यांना परत जाताना खूप कष्ट घ्यावे लागले. अनेकजण कित्येक दिवस व कित्येक किलोमीटर चालत गेले रस्त्यात जेवणाची आबाळ झाली, राहण्याचीही गैरसोय झाली. विशेषतः लहान मुले व वयोवृद्धांना खूप त्रास सहन करावा लागला. या कालावधीत शासनाने विविध उपाययोजना केल्या. लाखो नागरिकांना शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे त्यांच्या परराज्यातील गावी मोफत सोडले. अनेक ठिकाणी जेवणाची सोय, राहण्याची सोय व वैद्यकीय सोय केली. गावी जाईपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाने खूप चांगले नियोजन केले, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

लॉकडाऊन उठल्यानंतर मिशन बिगिन अगेन सुरू झाले. अनेक कामगार पुन्हा आपापल्या रोजगाराच्या शहरामध्ये परतले, त्यांचा संसार पुन्हा योग्य पद्धतीने सुरू होतोय तोपर्यंत पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे त्यामुळे पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले आहेत असे अनेक सामाजिक संघटना सांगत आहेत. अशा वेळी आकस्मिक निर्माण झालेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी  शासनाची  पूर्वतयारी असावी म्हणून लवकरच सार्वजनिक आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, परिवहनमंत्री, यांचे समवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सर्वांशी सविस्तर बोलणे झाले आहे. या बैठकीत असंघटित कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी व पत्रकार संशोधकांनाही निमंत्रित करणार आहोत, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या बैठकीत शासनाचे प्रवासासाठीचे नियोजन, अन्न, निवारा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन बाबत चर्चा होईल. कोरोना रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ गोऱ्हे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!