ध्यास विश्वसार्ह बातमीचा

घात करणाऱ्यांचे चेहरे लक्षात ठेवा” – अमरावतीत नवनीत राणांचा आक्रमक इशारा

अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी ४०० पार’च्या घोषणा देत होते, ते चेहरे आठवणीत ठेवा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. माझ्या पराभवामागे विरोधकांपेक्षा आपल्या गोटातीलच काही लोक कारणीभूत आहेत. आमच्यातच घात करणारे लोक होते, असा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवलं. माझा पराभव म्हणजे केवळ नवनीत राणांचा नाही, तर तो संपूर्ण अमरावती शहराचा पराभव आहे, असा दावा करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना नवनीत राणा भावनिक पण तितक्याच आक्रमक शब्दांत दिसून आल्या. लोकसभेत नुकसान कुणाचं झालं असेल, तर ते आमच्या मुलांचं झालं, असं म्हणत त्यांनी हा पराभव वैयक्तिक वेदनेशी जोडला. मात्र, ही वेदना गिळून गप्प बसणार नाही, असं ठामपणे सांगत ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी जाहीर केला. या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

याच भाषणात नवनीत राणा यांनी अमरावती शहराच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली. भाजपचा महापौर निवडून आला, तर शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. खासदार असताना अवघ्या पाच वर्षांत अमरावतीसाठी मेडिकल कॉलेज आणि पायलट ट्रेनिंग सेंटर आणल्याचा दाखला देत त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडला. सत्ता असो वा नसो, शहराच्या विकासासाठी आपली लढाई सुरूच राहील, असा ठाम संदेश त्यांनी दिला.

भाषणादरम्यान एक प्रसंग विशेष चर्चेचा ठरला. मंचाच्या टोकावर उभ्या असताना काही उमेदवारांनी ‘भाभी, खाली बघा, पडाल’ असं सांगितल्याचा उल्लेख करत ‘आता मी पडणार नाही’ असं प्रत्युत्तर देत त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ दिला. आतापर्यंत खूप काही सहन केलं, पण आता परिस्थिती बदलली आहे. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, त्यांच्याशी आता सौम्य वागणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.

यावेळी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि त्यांच्या पत्नीवरही जोरदार टीका केली. मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी थेट खोडके दाम्पत्यावर निशाणा साधला. कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि उलटे काटे फिरवायचा प्रयत्न करत आहे, असा टोला लगावत त्यांनी भगव्याची ताकद दाखवून दिली. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाली असल्याचं चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!