मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अहवालातील निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर शंका व्यक्त केल्या. अपघातातील काही बाबींकडे ‘क्रिमिनल अँगल’ने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, डीजीसीए आणि संबंधित व्हीएसआर कंपनीच्या मालकांमधील कथित जवळीक अधोरेखित करत निष्पक्ष तपासाची मागणी केली. “अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याची चर्चा काही लोकांमध्ये आहे. आमच्याकडे याबाबत ठोस माहिती नाही; मात्र या शक्यतेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. संपूर्ण घटनेचा सखोल आणि स्वतंत्र तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर दुर्घटनेच्या तपासाच्या दिशेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील काही तांत्रिक बाबी आणि घटनाक्रम संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. “फक्त तांत्रिक कारणांवर हा विषय संपवू नये; सर्व शक्यता तपासल्या गेल्या पाहिजेत,” असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. “ते काय आणि कसे मांडत आहेत याची मला सविस्तर माहिती नाही. जे हा विषय मांडत आहेत त्यांना अधिक अनुभव आहे. कालपर्यंत वेगळे बोलले जात होते, आज वेगळे बोलले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले. या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगत मुंडेंनी तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला. “विश्वास-अविश्वासाच्या गोष्टी पुढे स्पष्ट होतील. खरं कोण बोलत होतं, कोण भांडत होतं, आणि नेमकं कोणाला काय माहिती होतं, हे तपासातून समोर येईल,” असे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांकडून भिन्न भूमिका व्यक्त झाल्याने पक्षांतर्गत मतभेदांची चर्चा रंगू लागली आहे. रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली असताना, धनंजय मुंडे यांनी कोणतीही ठाम बाजू न घेता संयमित भूमिका मांडली.
डीजीसीएचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर सुरू झालेल्या या नव्या राजकीय वादामुळे आगामी काळात तपास यंत्रणांवर अधिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. बारामती विमान दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि शंकांना उत्तर मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.