पुणे : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म देशहितासाठी झाल्याचा दावा करत बारामतीच्या मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्र हितासाठी झाला आहे. त्यांची गरेंटी बाजारात चालते. याऊलट राहुल गांधी हे 54 वर्षांचे झाले, पण त्यांना काँग्रेस अद्याप लाँच करू शकली नाही. त्यांना आतापर्यंत चार ते पाच वेळा लॉन्च केले गेले, पण ते चालू शकले नाही. देशाने चांद्रयान लाँच केले, पण गांधी देशात चालू शकलेले नाही. त्यामुळे मोदी यांना देशात दुसरा पर्याय नाही, असे ते म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बारामती मध्ये परिवर्तन करण्याचे जनतेने ठरवले आहे. बारामतीकरांनी 15 वर्षे निवडून दिले, पण आता भाकरी फिरवणे वेळ आली आहे. बारामतीमधील लढाई ऐतिहासिक आहे. विकास वाद विरुद्ध विनाश वाद अशी ही निवडणूक आहे. देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. महायुती मधील प्रत्येक उमेदवाराचा विजय महत्त्वाचा आहे. ज्यांच्या मनात सुनेबाबत दुरावा आहे, त्यांना मनात मांडे खाऊ दे, पण विकासचे मॉडेल आपण मांडू. जेव्हा संधी आली तेव्हा अजित दादा यांच्यावर अन्याय झाला. सहनशीलतेचा अंत कधी तरी होत असतो. त्यामुळे त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वात काम सुरू केले आहे.
शरद पवार यांचे बोट सोडल्यावर मोदी यांनी देशाला विकासाकडे नेले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांचे बोट सोडून विकास दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सुनेत्रा पवार यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व चांगले आहे. त्यामुळे त्या खासदार होतील. मागील 10 वर्षात एकदाही सुट्टी न घेता देशाला समर्पित करणारे पंतप्रधान काम करत आहेत. देशात मोदी हेच निवडून येणार आहेत. काही लोक भावनिक काम करत आहे, पण कोणी कितीही आटापिटा केला तरी मोदी पुन्हा निवडून येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.