मुंबई, वृत्तसंस्था
कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत? ज्या महाराष्ट्रामध्ये हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, त्याची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठीच हे केलं. अदानी, लोढा , गुंडेचा आणि सगळे इतर अमराठी बिल्डर यांच्या घशात मुंबईचा परिसर घालता यावा यासाठी मोदी, शाह , फडणवीस आणि त्यांच्या गोतवाळ्याने मराठी माणसाला कमजोर केलंय, असं राऊत म्हणाले. विधानसभा निकालानंतर मराठी माणसावर होणारे हल्ले वाढायला लागले आहेत , असा आरोपही राऊत यांनी केला.
स्वत:ला जे शिवसेना समजतात, मोदी-शहांनी ज्यांच्या हातात शिवसेना आणि चिन्हं दिले, ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचत्ये का? असा थेट सवाल विचारत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. ते लोक नामर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी मराठी माणसाचं नुकसान केलंय. मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं हे फार मोठं कारस्थान आहे. काल कल्याणमध्ये मराठी माणसावर जो हल्ला झाला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहेकाय अवस्था आहे मराठी माणसाची ? . या सगळ्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याची लाज वाटली पाहिजे, असं राऊत म्हणाले.