ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

मुंबई,  वृत्तसंस्था 

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. इतकेच नाही तर त्यांनी INDIA आघाडीवरून मोठा इशारा पण दिला.

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेला जागा वाटपात जो घोळ घालण्यात आला, त्यावर नेमकं बोट ठेवलं. जागा वाटप दोन दिवसांत झाले असते तर निदान उर्वरीत दिवस प्रचारासाठी मिळाले असते. जागा वाटप ताणल्या गेल्यानेच विधानसभेसाठी कोणतेही नियोजन करता आले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यांनी या विलंबासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. त्यांनी नियोजनाचा अभाव, बैठकीला उशीर आणि इतर कारणांचा पाढाच वाचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्स जिवंत ठेवण्याची काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसने बैठक घ्यायला हवी होती. त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायला हवं होतं. पण एकही बैठक घेतली नाही. इंडिया अलायन्सचं अस्तित्व राहिलं नाही, असं लोकांना वाटत असेल तर ही काँग्रेसची जबाबदारी आहे. इंडिया अलायन्समध्ये संवाद राहिलेला नाही, असे एकामागून एक घणाघात त्यांनी काँग्रेसवर घातले.

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने इंडिया अलायन्सची जबाबदारी घेणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही आमचे मार्ग निवडून घेऊ. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. आता तिचं अस्तित्व नाही, असं काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी तसं अधिकृतपणे जाहीर करावं. तुम्हाला सांगतो, जर इंडिया अलायन्स एकदा फुटला तर पुन्हा इंडिया अलायन्स बनणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. ही भूमिका एखाद्या पार्टीची असेल तर ती मोठी पार्टी आहे. तुम्ही असं विधान करण्यापूर्वी विचार करा, असे त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!