मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून बिघाडी झाल्याचे चित्र असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शरद पवार हे मोदींपेक्षाही सिनियर आहेत. सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत. वास्तविक मोदी शरद पवार यांच्या बाजूला बसणार नाहीत असे मला वाटले होते. कारण भटकती आत्म्याच्या बाजूला पीएमओने त्यांना कसे बसू दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मोदींनी शरद पवार यांना दिलेला मान-सन्मान हा केवळ ढोंगीपणा असल्याचेही ते म्हणाले. त्यांचे केवळ ‘देखिल्या देवाला दंडवत’ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील रंगली होती. तर नरेंद्र मोदी शरद पवारांची काळजी घेताना देखील दिसून आले. या सर्वांची चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणाले होते. त्यावरुन त्यांच्या बाजूला मोदी कसे बसले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना दिलेला आदर आणि मान-सन्मान हा व्यापार आणि ढोंग असल्याचे ते म्हणाले. हे केवळ तेवढ्यापुरते मर्यादीत होते असा आरोपही त्यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी मनात आदर आणि मानसन्मान असल्याचे सांगतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती असलेली शिवसेना देखील मोदींनीच फोडली, शरद पवार यांचा कष्टांतून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. त्यामुळे देखिल्या देवाला दंडवत अशी मराठीत म्हण आहे. हा तसलाच प्रकार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांचे उजवे हात असलेले अमित शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय? असा प्रश्न विचारतात. तसेच या काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. आता त्यातला पुतण्या हा त्यांच्याच पक्षांमध्ये आहे. तर काकांसाठी स्वत: मोदी खुर्ची ओढत होते, याला आम्ही ढोंग म्हणतो, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्याविषयी खरा आदर असतो तिथे राजकारण होत नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दोन पाच मिनिटांसाठी का होईना, व्यापार झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याला फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.