मृत्यूनंतरही आपले सेवा कार्य चालू ठेवणारे सर्जेराव जाधव एकमेव
२७ व्या स्मृतिदिनानिमित्त अक्कलकोट येथे नेत्रचिकित्सा शिबिर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जिवंतपणी तर अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना आणि मान्यवर आहेत परंतु आपल्या मृत्यूच्या पश्चात देखील आपण हाती घेतलेले सेवा कार्य हे अखंडपणे चालू राहावे ही भावना ठेवणारे ऍड. सर्जेराव जाधव हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत, असे प्रतिपादन अक्कलकोट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी केले.शुक्रवारी, सर्जेराव जाधव सभागृहात जाधव यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.शरदराव फुटाणे- जाधव हे होते.पुढे बोलताना विभुते म्हणाले,दरवर्षी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट व विमलाबाई जाधव न्यास यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या माध्यमातून वंचित घटकांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जातो ही खरी समाजसेवा आहे.सर्जेराव जाधव यांच्या पश्चात देखील ही सेवा या ट्रस्टमार्फत अतिशय तळमळीने सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.ट्रस्टचे अध्यक्ष फुटाणे- जाधव म्हणाले, सर्जेराव जाधव यांनी आपल्या हयातीच्या काळातच या ट्रस्टची निर्मिती केली तेव्हाच त्याची आचार संहिता त्यांनी आखून दिली. त्यानुसारच आजही अतिशय प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने हे कार्य सुरू आहे. पुढे देखील ते सुरू राहील. तालुक्यातील निराधार व्यक्तींना याचा लाभ होत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर डॉ.अनुराधा अवस्थी,डॉ.विरेंद्र अवस्थी, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव ,उपाध्यक्ष अमर शिंदे,माजी अध्यक्ष राजीव माने, स्वामीराव पाटील,बाळासाहेब मोरे,सुरेशचंद्र सूर्यवंशी, सुभाष गडसिंग,प्रा.भीमराव साठे, प्रभाकर मजगे, विश्वस्त शंकरराव पवार,सुधाकर गोंडाळ आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त शिवाजीराव पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त मोहनराव चव्हाण यांनी केले तर आभार विश्वस्त संतोष जाधव -फुटाणे यांनी मानले.
आर्थिक धनादेशाचे वाटप
दरवर्षी मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते.यावर्षी यात १२० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ४० जणांची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय, शैक्षणिक अशा गरजूंना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.