ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सांगवी बुद्रुकच्या सरपंचांनी दिली गावाला मोफत गिरणी

स्वतःच्या मानधनाचा विधायक कामासाठी वापर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सांगवी बु येथील सरपंच वर्षा भोसले व मेजर बाळासाहेब भोसले यांनी ग्रामपंचायतीतर्फे मिळणारे मानधन एकत्रित जमा करून गावाला एक मदत म्हणून त्यांनी कायमस्वरूपी नवीन पिठाची गिरणी भेट दिली आहे.

अशा प्रकारचा उपक्रम राबवून लोकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या त्या पहिल्याच सरपंच ठरल्या आहेत. भोसले सरपंच होऊन साधारण ३ वर्ष झाले आणि ८० हजार मानधन जमा झाले होते. ज्या व्यक्तींनी शंभर टक्के घरपट्टी भरली त्यांना मोफत दळण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते या गिरणीचे लोकार्पण करण्यात आले. मेजर भोसले यांच्या या कल्पनेचे गावात मोठया प्रमाणात कौतुक होत आहे.याचा फायदा ग्रामपंचायतीला त्यांची थकीत घरपट्टी वसुल होण्यासाठी होणार आहे.

घरपट्टी वसुल झाल्यास आम्हाला यापुढे अजून नविन उपक्रम राबविण्याचा मानस सरपंच वर्षा भोसले यांनी बोलून दाखविला आणि गावकऱ्यांनी सर्व थकीत कर भरून मोफतमध्ये दळण या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या धाडसी निर्णयाचे गावातील महिला मंडळींनी स्वागत केले आहे.आज साधारणपणे एका कुटुंबाचा विचार केला असता एका कुटुंबाला ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये वार्षिक दळणाचा खर्च येतो आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी १ हजार ५०० ते २ हजार रुपये येतो.याचा विचार केला असता प्रत्येक कुटुंबाचा खुप मोठा आर्थिक फायदा होतो,असे मत उदघाटनप्रसंगी मेजर भोसले यांनी व्यक्त केले.याप्रसंगी माजी सरपंच अबुबकर शेख, माजी सरपंच सुभाष रेड्डी, माजी सरपंच आप्पशा कोळी,संजयकुमार भोसले, विद्वान रेड्डी, प्रविण घाटगे, ग्रा. पं. सदस्य प्रदिप सलबत्ते, गणेश मोरे,ताजोद्दीन कागदे, हनिफ शेख, बकर शेख,शालू शेख, दादा भोसले, प्रताप भोसले, हाजू मुजावर, खाजूभाई शेख,जिलानी शेख, शांतकुमार सोनकांबळे, बबन गायकवाड, परशु रेड्डी,महेश भोसले, रमजान मुल्ला, कल्याणी सोनकांबळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्याला अनोखी भेट
बऱ्याच दिवसापासून या संकल्पनेबाबत घरी चर्चा झाली होती आणि त्याबाबत गुढीपाडव्याला हा उपक्रम आपण सुरू करूया असा संकल्प झालेला होता. त्यानुसार गावचा थकीत करही वसूल व्हावा आणि विकासाला हातभार लागावा यासाठी हा निर्णय घेतला ग्रामस्थांनी या उपक्रमाला सहकार्य करावे.
– वर्षा भोसले,सरपंच सांगवी बु

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!