सोलापूर : प्रतिनिधी
तब्बल पस्तीस वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र जमलेल्या श्री सिद्धेश्वर प्रशालेतील वर्गमित्रांनी विविध उपक्रम आणि सामाजिक कार्ये आणि रोजगारनिर्मितीमधून जन्मगाव सोलापूरचे ऋण फेडण्याचा संकल्प व्यक्त केला.
१९८८-८९ सालच्या दहावीच्या वर्गात सिद्धेश्वर प्रशालेत एकत्र शिकलेल्या मित्रांनी हुरडापार्टीच्या निमित्ताने पाकणी येथील पिकनिक पाॅईंट येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यात सोलापूरातीलच नव्हे तर मुंबई, पुणे,लातूर व इतर शहरात स्थायिक झालेले एकूण तीसजण सहभागी झाले होते. नोकरी-व्यवसायाच्यानिमित्ताने महाराष्ट्रात इतरत्र स्थायिक झालेले सोलापूरकर आज विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. उद्योजक राजेश देशमुख, विरेंद्र मायनाळे,शैलेश पुराणिक, सागर गांधी यांनी बेरोजगारांना व्यवसायसंधी उपलब्ध करुन देण्याविषयी मत व्यक्त करुन त्याबाबत कृतीशील राहणार असल्याचे सांगितले.
दत्ता कवचाळे यांनी मित्रांशी जुळलेल्या स्नेहबंधामुळे आजारपणात वेळीच उपचार मिळाल्यामुळे आपला जीव वाचला असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. सोलापूर शहर व जिल्ह्यात कृषीउत्पादनांवर आधारीत प्रक्रियाउद्योग, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे यातून स्थानिक उद्योगनिर्मितीला हातभार लागू शकतो आणि त्यासाठी आपण मार्गदर्शनासाठी तत्पर असल्याचे पाश्चराइज्ड उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ संगमेश्वर अंदेली यांनी सांगितले. प्रगतीशील शेतकरी सिद्धाराम बिराजदार यांनी शेतीव्यवसायातील अनुभव सांगितले. पुढील काळात सेंद्रीयशेतीकडे लक्ष देऊन विषमुक्त धान्य,फळे व गुळउत्पादनाचा संकल्प असल्याचे सांगत पुणे-मुंबईतील सोलापूरकर मित्रांना उत्तम वाणाची ज्वारी वाजवी दरात नियमित पुरवण्याची हमी दिली. गिरीष ज्योती आणि उमेश उळागड्डे यांनी वेअरहाऊसेस आणि टेक्स्टाईल उद्योगातील नवनव्या संधींमधून तरुणांना करियर घडविता येणे शक्य असल्याचे सांगितले.
संजय सिंदगी यांनी भुसार बाजारपेठेतील तेजीमंदी,साठवणूकी संदर्भातले अनुभव सांगितले तसेच भरड व गळीत धान्योत्पादनातून शेतकरी कसे खात्रीचे उत्पन्न मिळवू शकतील याची माहिती दिली. मरीन व्यवसायातील फसवणूक टाळण्यासाठी या क्षेत्रात करियर करण्यासाठी इच्छुक युवकांना मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी राजेश हिरजे यांनी दर्शविली. ताणतणावमुक्त निरामय जीवनशैलीच्या आवश्यकतेविषयी शैलेंद्र गिराम यांनी समुपदेशन केले. मकरंद माने,नईम सय्यद यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायसंधींविषयी सांगितले. बाराशे वर्षांपूर्वी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनीदेखील सोन्नलगीत लोककल्याणाचे उद्दीष्ट समोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबवताना शरणपरंपरेतून सर्व समाजघटकांना एकत्र केले होते. म्हणूनच ‘कायकवे कैलास’ हे निव्वळ ब्रीदवाक्य न राहता सामाजिक-आर्थिक उत्थानाचा मंत्र बनू शकला जो आजच्या काळातही सार्थ ठरावा. शाळकरी मित्रांच्या सहवासात बाळपणीच्या रम्य आठवणींचा भरजरी पट उलगडण्याची सुवर्णसंधी प्रत्येकालाच मिळते असे नाही, पण अशा स्नेहमेळाव्यातून ती दरवर्षी मिळत राहावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. आयोजनाची जबाबदारी उल्हास गुमडेल,मंगेश स्वामी,द्वारकानाथ तावनिया यांनी पार पाडली.