ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिबट्याच्या भीतीने शाळेला सुटी ; छत्रपती संभाजीनगरात शोध सुरु

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील उल्कानगरी भागात गेल्या तब्बल ७० तासांपासून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचा माग लागलेला नाही. बुधवारी (१७ जुलै) दिवसभर ९० जणांच्या टीमने बिबट्याचा शोध घेतला. बिबट्याचे सीसीटीव्हीमध्ये मंगळवारी पहाडे साडेपाचच्या सुमारास चित्रीकरण झाले होते. त्यानंतर या भागातील सीसीटीव्हीत त्याचे चित्रीकरण झाले नाही. दरम्यान, गुुरुवारी या भागातील पोदार शाळेला सुटी दिली आहे.

मिळालेली माहितीनुसार, उल्कानगरीत सोमवारपासूून बिबट्याचा वावर आहे. वन विभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. नाशिक येथील ४ ,जुन्नर येथील ११ वनरक्षक कर्मचाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर येथील ९० कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहे. बुधवारी वन विभागाने उल्कानगरीपासून ते पैठण रोडवरील बेस्ट प्राइसपर्यंत बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या असल्याचा कोणताही सुगावा आढळला नाही. झाडाझुडपांत पिंजरा ठेवला असून भक्ष्य म्हणून त्यात शेळी ठेवली आहे. याशिवाय बिबट्याला जाळे लावून पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जंगली श्वापदे पकडण्यासाठी त्यांच्या पायांच्या ठशांचा माग घेतला जातो. मात्र, सिमेंटचे रस्ते आणि पावसाचे पाणी यामुळे वन विभागाला बिबट्याचे ठसे आढळले नसल्याचे सांगितले जाते. उल्कानगरीतून मोठा नाला पैठण रोडवरील बेस्ट प्राइसकडे जातो. याचमार्गे तो तिसगाव परिसरात गेला असल्याचे चर्चा आहे. दरम्यान, परिसरात असलेल्या पोदार शाळेला खबरदारी म्हणून गुरुवारी सुटी दिली आहे, अशी माहिती पालकांनी दिली. उल्कानगरी भागात आलेली बिबट्या ही मादी असून ती पिल्लांसाठी अन्नाचा शोध घेण्यासाठी एवढ्या लांब येऊ शकते, अशी माहिती प्राणिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!