नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जुनी व कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना या नव्या वाहन खरेदीवर 1.5 टक्के ते 3 टक्के सवलत देण्यास वाहन कंपन्या तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी भारतीय वाहन उत्पादकांची मध्यवर्ती संघटना असलेल्या सियामच्या शिष्टमंडळासमवेत भारत मंडपम येथे बैठक घेतली. यावेळी मंत्रिमहोदयांनी वाहन उत्पादकांपुढील प्रश्न व समस्या समजून घेतल्या. चक्रीय अर्थव्यवस्था आणि वाहनांचे आधुनिकीकरण या दोन्हींविषयी गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. चक्रीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व ओळखून तिला गती देण्यासाठी विविध प्रकारची व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या प्रवासी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मर्यादित काळासाठी वाहन खरेदीवर सवलती देण्याची तयारी दर्शवली. परंतु अशी सवलत वाहन भंगारात काढणाऱ्या व तसे प्रमाणपत्र दाखवून नवे वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनाच दिली जाईल, असेही या बैठकीत ठरले. ही माहिती या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.
अशी वाहने अशा सवलती
मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, ह्युंदाई मोटर इंडिया, किया मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स, जेअसडब्ल्यू एमजी मोटर, रेनॉ इंडिया, निस्सान इंडिया आणि स्कोडा फोक्सवॅगन इंडिया यांनी नव्या कारच्या एक्स-शोरूम किंमतीवर 1.5 टक्के किंवा 20 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती सवलत देण्याची तयारी दाखवली आहे. वाहनमालकाने मागील सहा महिन्यांत भंगारात काढलेल्या वाहनांच्या बदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी दाखवल्यास या कंपन्यांकडून ही सवलत दिली जाणार आहे.