मुंबई : वृत्तसंस्था
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे. तसेच एनडीए आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. भाजपला पैशांची चटक लागली असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, उपराष्ट्रपती पदासाठीची ही निवडणूक ही संविधानाप्रमाणे झाली पाहिजे. पण, भाजपला पैशांची चटक लागली आहे. इंडिया आघाडीची सर्व मते ही ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षातले लोक आहेत, त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर दबाव होता. बीजेडी, अकाली दल, तेलंगणा राष्ट्रसमिती हे भाजपकडून उभे आहेत. हे पक्ष उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक करण्यासाठी तयार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ते तीन पक्ष तटस्थ राहिले हेच भाजपचे अपयश आहे. शंभर पेक्षा जास्त मताने निवडून यायचे असेल तर आज संध्याकाळपर्यंत दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. आमच्याकडून बी सुदर्शन रेड्डी आम्ही निवडणुकीत उतरवले आहेत. पाहू काय होते ते. परंतु, हे मात्र खरे आहे की सभागृहात सरकारच्या बाजूने उभे राहणारे पक्ष आज तटस्थ आहेत.
ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन व्हायला निघाला आणि ते दुसऱ्यांचे आमदार विलीन व्हायच्या गोष्टी करत आहेत. आताची जी शिवसेना आहे, ही निष्ठावंतांचा आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा अपमान केला आहे. भविष्यात शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होणार, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी एक विधान केले होते की लोकांना वाटले माझी राख होतेय, पण मी भरारी घेतली. यावर संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हटले की, ते जे बोलले ते बरोबर बोलले आहेत. फिनिक्स पक्ष हा राखेतून भरारी घेतो. त्यांनी शिवसेनेचे उदाहरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले, पण शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहील. त्यामुळे त्यांनी स्वतःची तुलना जर फिनिक्स पक्षाशी केली असेल तर त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच सहकाऱ्यांनी केला आहे.