सोलापूर : वृत्तसंस्था
माढा तालुक्यातील खैराव येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या टोळीतील चार तरुण गुरुवारी सोलापुरातील सीना नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असताना नदीपात्रात बुडाले असून त्यांची शोधमोहीम सुरू आहे. लवकरच सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामासाठीच्या टोळ्या गावागावात येऊ लागल्या आहेत. ऊस तोडणीसाठी करार केलेले वाहनधारक ऊस तोडणी मजुरांना गावाकडे घेऊन आले आहेत.
हंगाम सुरू होण्यास अवधी असल्याने खैराव येथे मुक्कामी असलेल्या टोळीतील शंकर विनोद शिवणकर (२५), प्रकाश महादेव धाबेकर (२५, दोघे रा. लासणटेकडी, ता. जि. यवतमाळ) तर अजय महादेव माणगाव (२५) व राजू रामभाऊ गेडाम (२३, रा. पटापांगरे, ता. घाडगी, जि. यवतमाळ) ही तरुण मुले नदीपात्रात बुडाली असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. ही तरुण मुले गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास नदीपात्रात पोहायला गेली असताना एकजण पहिल्यांदा पोहण्यासाठी नदीत गेला. तो नदीपात्रातील भोवऱ्यात अडकला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनाही स्वतःला वत्याला वाचवता आले नाही. नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यांना शोधण्यासाठी अडचणी येत आहेत.
याबाबत तहसीलदार विनोद रणवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीद्वारेही तपास करणे अवघड झाले असल्याने सीना कोळेगाव धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करून बंधाऱ्याची दारे टाकून पाण्याचा प्रवाह कमी करून शुक्रवारी सकाळी शोधमोहीम सुरू करावी असल्याचे सांगितले.