भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असतांना नुकतेच दोन दिवसापूर्वी हे आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडविले आहे. तर राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचं काम जोरात सुरू आहे. शालेय शिक्षकांना सर्वेक्षणाचं काम देण्यात आलं आहे. शिक्षकांवर या कामाचा भार आल्याने त्यांनी हा भार विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे.
सर्वेक्षणाच्या कामामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांना ओव्हर टाइम कारावा लागत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसत आहे. ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना सर्वेक्षण सुरू झाल्याने काही शाळांमध्ये बारावी आणि दहावीच्या सराव परीक्षांवर याचा परिणाम झाला. अशात आता भंडारा जिल्ह्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षक आपल्या कामासाठी विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हिडिओ लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील असून या प्रकरणी मेंढे शिक्षकाचे नाव समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांना विचारले असताना त्यांनी शिक्षण अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर योग्य चौकशी करुन कारवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगीतले आहे.
सरकारकडून मिळणारा भरगच्च पगार शिक्षक घेतात. मात्र आपले काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनासोबत घेतात. शिक्षकांसोबत गेल्याने विद्यार्थ्यांचे नक्कीच शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता या शिक्षकावर काय कारवाही होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.