मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत असून कधी पावसाच्या सरी तर कधी थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर गेल्या काही दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. थंडी ओसरत असल्याचे चित्र दिसत असतानाच आरोग्याच्या समस्या मात्र वाढताना दिसत आहेत.
वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याने मुंबईसारख्या महानगरात श्वास घेणेही धोकादायक बनले आहे. हवामानातील या बदलांचा थेट परिणाम जनजीवनावर होत असून, मतदानासाठीही अनेक नागरिक मास्क घालून घराबाहेर पडल्याचे चित्र दिसले. मुंबईची हवा इतकी घातक झाली आहे की प्रशासनाने नागरिकांना मास्क घालूनच बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात हवामानात चढउतार सुरूच राहणार आहेत. डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली असली, तरी जानेवारीत थंडी काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. याचे मुख्य कारण उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींची तीव्रता घटल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. मात्र, उत्तरेकडील भागांत सध्या कडाक्याची थंडी असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत राज्यावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वात नीचांकी तापमान निफाडमध्ये नोंदवले गेले असून ते 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे. धुळ्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. इतर भागांत मात्र थंडी कमी होऊन उकाडा वाढल्याचे चित्र आहे. तरीही जानेवारी महिन्यात थंडी कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस थंडीची लाट ते तीव्र थंडीची लाट राहण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडे थंडीचा जोर वाढल्यास महाराष्ट्रातही पुन्हा थंडी वाढू शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.