सांगोला प्रतिनिधी : येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जातील, असे अजब आणि वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले. “ज्यांनी धनुष्यबाणाचे बटण दाबले, त्यांना स्वर्गातच जागा आहे. देव त्यांना नरकात जाऊच देत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना भावनिक साद घातली.
सभेत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली, त्यांच्यात रामच उरलेला नाही,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
याच भाषणात त्यांनी आपल्या विधानसभेतील पराभवाचा उल्लेख करत दीपक साळुंखेंवर निशाणा साधला. “मी भाकरीत साप पाळला, म्हणूनच मला विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला,” असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अंतर्गत विरोधावर बोट ठेवले. तसेच आपण आजही महायुतीत असल्याचे स्पष्ट करत, युतीधर्म पाळण्यावर भर दिला.
भाजपला इशारा देतानाच शहाजीबापू पाटील म्हणाले, “हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवलात, तर आम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. पण तसे झाले नाही, तर आम्ही पुन्हा एकट्याने वाटचाल करू.” त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.