ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार भाजपशिवाय राहू शकत नाहीत ; १५ दिवसात मोठी बातमी : आंबेडकरांचा गंभीर आरोप !

पंढरपूर : वृत्तसंस्था

राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत आणि ते भाजपशिवाय राहू शकत नाहीत. पुढील 15 दिवसांत मोठी बातमी समोर येईल.” या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी आंबेडकरांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, “आंबेडकरांनी स्वतःच्या पक्षाचा विचार करावा. विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रयत्न झाले, पण त्यांनी अवास्तव मागण्या केल्या. यामागे कोण हस्तक आहे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.”

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आंबेडकरांवर टीका करत म्हटले, “वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. आकडेवारी पाहिली तर हे स्पष्ट होते की, वंचितच्या उमेदवारांमुळे भाजपचे उमेदवार निवडून आले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी बनवलेली पैठणी भेट दिली. ही भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात आले, परंतु यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळे आणि सुळेंच्या भेटीमुळे पुढील 15 दिवसांत राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!