ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार गट लागला कामाला : चिन्हाची भीती बाळगू नका

मुंबई : वृत्तसंस्था

अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता शरद पवार गटाने नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाचे नाव व चिन्हाची भीती न बाळगण्याचा कानमंत्र दिला. लोक आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेत. ते पक्षाचे चिन्ह व नाव कुणाचे हे चटकन ओळखतात. त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका, असे ते म्हणालेत.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रवादीचा विजय निश्चय मेळावा झाला. त्यात जयंत पाटील पक्षचिन्हासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, 1999 साली आम्ही घड्याळ चिन्ह घेतले होते. तेव्हा मला हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल का? अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी तेव्हा लहान मुलांना घड्याळाचे प्लॅस्टिकचे बिल्ले छापून देत होतो. ती मुले हे बिल्ले घरोघरी नेऊन देत होते. पण आता लोक आपल्यापेक्षा फार पुढे गेलेत. लोक चिन्ह ओळखतात. तसेच नाव कुणाचे आहे हे ही ओळखतात. त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. ते लोकांपर्यंत आपोआप पोहोचेल.

राज्यसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे आम्ही 10-12 जण कोणत्या नावाने काम करणार? यासाठी पक्षाचे नाव द्यायचे आहे. कदाचित तेच नाव पुढेही वापरले जाईल. त्या नावानिशी घरोघरी पोहोचण्याचे काम आपल्याला करायचे आहे. नवे चिन्हही आपल्या घरोघरी पोहोचवायचे आहे, असेही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!